लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी पैशाची मागणी करत असेल तर आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या कक्षासमोर ठळक अक्षरात सूचना फलकही लावला आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित एखादे काम करून देण्याच्या नावाखाली एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून संबंधितांकडे पैशाची मागणी होऊ शकते. पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास नियमात बसणारे शासकीय काम करण्यास टाळाटाळ होते. हा प्रकार टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आपल्या कक्षासमोर एक सूचना फलक लावला आहे. ‘जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत शासकीय कामाकरिता जिल्हा परिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी स्वत: किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पैशाची मागणी करत असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ८६९१०२१११८ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवावा’, असा या सूचना फलकावरील आशय आहे. वाशिम जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कक्षासमोर असा फलक लावलेला नाही, हे विशेष. त्यामुळे शासकीय कामाकरिता कुणी अधिकारी, कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पुराव्यानिशी तक्रार नोंदवता येणार आहे.
कोट बॉक्स
नियमात बसणारे कोणतेही शासकीय काम हे विनाविलंब, पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय कामाकरिता कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैसे देऊ नये. पैशाची मागणी कुणी करत असेल तर थेट व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवावा. या मेसेजची शहानिशा केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.
- मंगेश मोहिते,
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम