रिसोड : २० टक्के अनुदानास पात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे मार्चपासून पुढील वेतन ऑफलाईन काढण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत पटवे यांनी अवर सचिव, शालेय शिक्षण यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली.
१५ फेब्रुवारी २०१९च्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना २० टक्के वेतन अनुदान देय करण्यात आले. याच निर्णयान्वये नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१पर्यंत वेतन वितरित करण्यात आले. मात्र, या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत शालार्थ आयडी न मिळाल्यामुळे त्यांच्या मार्च महिन्यापासून पुढील वेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्न लक्षात घेऊनच ॲड. किरणराव सरनाईक यांनी शिवलिंग पटवे (शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग) यांना पुढील वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्यासाठी सूचित केले आहे. या सूचनेची तत्काळ दखल घेऊन पटवे यांनी अवर सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.