कोरोना महामारीमुळे मागील एक वर्षापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. यासाठी कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात जिल्ह्यातील सुमारे तीनशेच्या जवळ असलेले खाजगी कोचिंग क्लासेस मागील वर्षभरापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या संचालकांवर उपासमारीची वेळ आली असून, जिल्हा प्रशासनाने ज्याप्रमाणे लग्न समारंभ, बस प्रवास, रेल्वे प्रवास, अभ्यासिका व विविध आस्थापनांमध्ये २५ लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे, त्याप्रमाणे कोरोनाच्या नियम व अटीनुसार खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याचीसुद्धा परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रा. पंकजकुमार बांडे, जिल्हा सरचिटणीस प्रा. गोपाल वांडे, कोषाध्यक्ष प्रा. आदेश कहाते, प्रा. अतुलकुमार वाळले व अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.