वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. या गावातील रस्ते अतिक्रमणामुळे बाधित होऊन अरुंद झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे गावही विद्रूप दिसते. अतिक्रमणे काढून रस्ते रुंद करावे यासाठी २०१५ पासून ईमदाद बागवान यांनी जिल्ह्यातील विविध प्रशासनाला विनंती केली आहे. मात्र यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. नाइलाजास्तव बागवान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली. सदर याचिका निकाली काढताना नागपूर उच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारी २०१८ रोजी शिरपूर गावातील अतिक्रमण तत्काळ हटवून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकारसह जिल्हा प्रशासन व शिरपूर ग्रामपंचायतला दिले होते, तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यावर पुन्हा याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्याबाबत निदर्शनास आणून दिले. यावर खडबडून जागे होऊन प्रशासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. मात्र यावेळी काही मोजक्याच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने अतिक्रमण हटविण्यासह आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र विकास आराखडा तयार करण्यात आलाच नाही. आता तर शिरपूर येथील रस्त्यावर पूर्वीपेक्षाही अधिक प्रमाणात व पक्के अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे बागवान यांनी ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे शिरपूर येथील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून मोजमाप करावे, तसेच विकास आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करावा. त्यानंतरच विकासाचे ठराव घ्यावेत, अशी विनंती केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत शिरपूर यांनासुद्धा देण्यात आल्या आहेत.
गावातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:51 AM