निवेदनात नमूद आहे की, शहरात काही वर्षांपूर्वी भुयारी गटार योजना राबविण्यात आली. त्यानंतर मोठे रस्ते दुरुस्त करण्यात आले ; मात्र गल्लीबोळातील रस्त्यांचे अद्याप नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदर योजना राबविल्यानंतर दोन ते तीन वर्षे होऊनही हा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे रस्त्यावरुन ये-जा करण्यास त्रास जाणवत आहे. नंदीपेठ भागातील फुलोरे यांच्या घरापासून जुना बकरा मार्केट पर्यंतचा रस्ता, भागडे दवाखाना जवळील भुकणे गल्ली, श्री खोलेश्वर मंदिर ते उज्ज्वल देशमुख यांच्या घरापर्यंतचा रस्ता, डॉ. वाळले यांचे घर ते कोंडवाडा पर्यंतचा रस्ता, नंदीपेठ भागातील विभुते गल्ली, मन्नासिंह चौक ते परळकर चौकापर्यंतचा रस्ता, परळकर चौक ते राघोबा मंदिरापर्यंतचा रस्ता, राघोबा मंदिर ते माहुरवेश पर्यंतचा रस्ता सध्या मोठ्या प्रमाणात नादुरस्त झालेला आहे. यामुळे विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचून नागरिकांचे अतोनात हाल होतात. याकडे नगरपरिषदेने लक्ष पुरवून किमान डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनविसेने केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, जिल्हा सरचिटणीस अमोल गाभणे, राजू तिडके, किशोर धोंगडे यांच्यासह प्रभागातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वाशिममधील अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM