वाशिम - ‘भटक्या जाती-ब’ या प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी कासार समाजबांधवांनी २८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.कासार समाजबांधव राज्यभर विखुरलेल्या अवस्थेत असून, विकासापासून कोसोदूर आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कासार समाजाचा समावेश हा भटक्या विमुक्त जाती (भटक्या जाती-ब) प्रवर्गात करण्याची मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे. सध्या कासार समाज हा ओबीसी प्रवर्गात आहे. कासार समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जाती (भटक्या जाती-ब) प्रवर्गात करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ आॅगस्ट रोजी वाशिम येथे मोटारसायकलद्वारे मूकमोर्चा काढण्यात आला. सकाळी १०.३० वाजता कासार समाजबांधव श्री बालाजी संस्थान वाशिम येथे एकत्र आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून मूक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केला. त्यानंतर बसस्थानक चौक, सिव्हिल लाईनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जागतिक कासार समाज फाऊंडेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष तथा वाशिम येथील नेते राजेश्वर मोहिरे, सुधीर रंगभाळ, सुरेश खरावन, नितेश भिंगे, अॅड. वानरे, अनंता रंगभाळ, संतोष वाघ, उमाकांत शेंडे, वसंतराव खरावण, उमेश कथले, बालाजी वाघ, हेमंत रंगभाळ, बबन वाघ, सुनील महाजन, प्रवीण मुरकुंदे, विनोद रंगभाळ, संजय रंगभाळ, शंकर शेंडे, गोपाल रंगभाळ, प्रकाश महाजन, राहुल रंगभाळ, चेतन रंगभाळ, महाविर वाघ, ऋषिकेश रंगभाळ, शुभम मोहिरे, अॅड. राम महाजन, धनंजय हलगे यांच्यासह शेकडो समाजबांधव तसेच जागतिक कासार संघटनेच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देण्यात आले.