हाताना येथून मानोरा- दिग्रसदरम्यान असलेल्या पूर्वीच्या राज्य महामार्गाचा दर्जा वाढ करून राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. हातना येथून जात असलेल्या ह्या निर्माणाधीन महामार्गाच्या खोदकामामुळे हातना गावातील सांडपाण्याला बाहेर पडण्याला मार्ग नसल्यामुळे गावातील गटामधील घाणेरडे पाणी कित्येक महिन्यांपासून तुंबून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण नसताना महामार्गाचे चालू काम काही विशिष्ट लोकांनी विनाकारण बंद पाडल्याने हातना येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची लेखी तक्रार १६ जानेवारीला ग्रामस्थांनी दिली होती. निर्माणाधीन महामार्गाचे काम पूर्ववत चालू करण्यात न आल्यास १९ जानेवारीला रास्ता रोको करण्याचा लेखी इशाराही ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाला दिला होता.
लेखी इशारा देऊनही महामार्गाचे काम बंद असल्याने हातना येथील सरपंच,उपसरपंच आणि जागरूक नागरिकांसोबत भाजपचे जि.प. सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोदरम्यान दोन्ही बाजूंनी ये-जा करणारी प्रवासी वाहतूक खंडित झाल्याने आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी महसूल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी आले. वरिष्ठांना अहवाल सादर करून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. (तालुका प्रतिनिधी)