वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूदरही वाढत आहे.
जिल्ह्यात उपाययोजनांची कमतरता भासत असल्यामुळे आगामी काळात याबाबत व्यवस्थित नियोजन करण्यासाठी व बाधित आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नियोजन कक्ष व उपाययोजना कक्ष उभारण्याची मागणी मनसेने जिल्हाधिकारी यांच्याकडे गुरूवारी एका निवेदनाद्वारे केली आहे.
विनामास्क फिरणार्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. साेबतच प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करुन अधिकाधिक तपासण्या करण्यात याव्यात. तपासणी अहवाल प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. शहरामध्ये एक अतिरिक्त कोविड सेंटर उभारण्यात यावे. याकरिता बर्याच रिकाम्या असलेल्या शासकीय इमारतींपैकी एखादी शासनाची इमारत अधिग्रहीत करुन त्याठिकाणी व्यवस्था व्हावी. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवून सर्वसामान्यांना किफायतशीर दरात व रुग्णालयाच्या आसपास उपलब्ध व्हावेत, याकरिता शासन यंत्रणेमार्फत किंवा शासनाने अधिकृत केलेल्या संस्थेमार्फत विक्री व्हावी, प्राणवायू बंबाच्या उपलब्धतेबाबत काळजी घ्यावी, आरोग्य यंत्रणेने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, ६५ वर्षांवरील दुर्धर आजाराने पीडित सामान्यांना गृहभेटीद्वारे लसीकरणाची व्यवस्था करावी. केंद्रामधील कर्मचार्यांनी परिस्थितीचेे भान ठेवून सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, त्यामुळे सौहार्दपूर्वक वातावरण राहील. तसेच आरोग्य यंत्रणेने दक्ष राहुन आवश्यक सूचना निर्गमित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.