वाशिम : वाशिम ते मंगरूळपीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरापासून जागमाथा मंदिरापर्यंत या रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघातांची शक्यता उद्भवली आहे. गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
.....................
नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका
वाशिम : कोरोनाविषयक नियम तोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुषंगाने मास्क न वापरता फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत असल्याची माहिती शहर वाहतूक निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.
...........
रस्त्यांची कामे मार्गी लागणार
वाशिम : शहर विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून विशेषत: मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.
........
‘एबी’ केबलमुळे चोरीस आळा
मानोरा : ‘एअर बंच’मुळे (एबी केबल) वीज चोरीस बहुतांशी आळा बसला आहे. मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे केबल टाकण्यात आल्याने महावितरणचा फायदा होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
................
अनसिंग येथे कोरोनाविषयक मार्गदर्शन
अनसिंग : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आरोग्य विभागाकडून गुरुवारी कोरोनाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.............
दुकाने बंदमुळे लघुव्यवसाय ठप्प
वाशिम : जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे विशेषत: पादचारी मार्गांवरील सर्वच दुकाने बंद असल्याने लघुव्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे.
..............
वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून निर्बंध लागू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक घराबाहेरच पडणे टाळत आहेत; मात्र काही लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागत असून वाहनांअभावी त्यांची गैरसोय होत आहे.
.................
रेती वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
रिसोड : चोरट्या मार्गाने शहरात येणाऱ्या रेतीची राजरोस वाहतूक सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे महसूल बुडत असून तहसीलदारांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
...............
स्वतंत्र कार्यालय नसल्याने गैरसोय
वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतीत सुरू असून सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे.
.............
अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात
किन्हीराजा : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी शे. रऊफ यांनी केली.
...............
एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त
वाशिम : रिसोड नाका परिसरातील एटीएम अधिकांश वेळा बंद राहणे, त्यात पैसे नसणे, आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुरुवारीदेखील असाच अनुभव नागरिकांना आला. याकडे बँकांनी लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
......................
ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाऊन
वाशिम : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावपातळीवरील कामांचा खोळंबा होत आहे. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी गोलू बरवे यांनी जिल्हा परिषदेकडे केली.
...................
कोंडवाड्याची दुरुस्ती करण्याची मागणी
शिरपूर जैन : येथील बसस्थानकाला लागून असलेल्या गुरांच्या कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून त्यात गुरे कोंडली जात नाहीत. कोंडवाड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.