लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम ते बडनेरा जंक्शनपर्यंत जाणाऱ्या वाशिम-बडनेरा या नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला सन २००७ च्या रेल्वे बजेटमध्ये मंजुरी मिळाली होती. १० वर्ष लोटूनही प्रस्तावित रेल्वेमार्गाचा प्रश्न गुलदस्त्यात आहे. रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याची मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १६ मे रोजी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. वाशिम-बडनेरा हा नवा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास या मार्गावरून बंगळूर ते वाशिम-बडनेरा, नरखेड, इटारसी मार्गाने दोन्हीकडील रेल्वेची ये-जा सुरू होईल. यामुळे या मार्गावर सद्या वाशिमवरून बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर बंगळूर, परभणी, पूर्णा, हिंगोली आणि वाशिम मार्गावरील कारखान्यांना कच्चा माल आणण्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न अधिक असल्यामुळे या पिकालाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. बंगळूर-दिल्ली हा रेल्वेमार्ग वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गाला जोडल्या जाईल. त्यामुळे ६३५ किलोमीटर अंतर कमी होऊन पैशांसोबतच प्रवाशांचा सात तासांचा वेळही वाचणार आहे. वाशिम-बडनेरा रेल्वेमार्ग वाशिमसह जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा या तालुक्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे धनज येथील गॅस प्लँटसाठी सुविधा उपलब्ध होईल. सोबतच अमरावती, नागपूर यासह पुढे जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. एकूणच सर्व बाबतीत अत्यंत उपयोगी ठरू पाहणाऱ्या वाशिम-बडनेरा या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला सन २००७ च्या रेल्वे बजेटमध्येच मंजूरात मिळाली होती. मात्र, त्यानंतर ठोस पाठपुरावा न झाल्याने या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा प्रश्न गुलदस्त्यात आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला.
वाशिम-बडनेरा रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी
By admin | Published: May 17, 2017 1:40 AM