सुनील काकडेवाशिम : पोलिसांत दाखल तक्रारीच्या अनुषंगाने ‘आरटीआय’अंतर्गत माहिती मागवून त्याआधारे बदनामी करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पत्रकारावर पोलिसांनी ३० जून रोजी गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवि गोविंदराव इंगळे (६०, रा. मेन रोड सिव्हील लाईन, मंगरूळपीर) याने ९ मार्च २०२३ रोजी न.प. उर्दू शाळा क्रमांक ३ ची माहिती माहिती अधिकाराअंतर्गत मिळवून उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मो. सलीम शे. मोबीन (४८) यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास शाळेची बदनामी करू, अशी धमकी दिली. त्यामुळे भितीपोटी मो. सलीम शे. मोबीन यांनी रवि इंगळे यास ८ हजार रुपये तेव्हाच देऊन उर्वरित २ हजार रुपये २७ मार्च २०२३ रोजी दिले.
त्यानंतर इंगळे याने मो. सलीम यांची पत्नी ज्या गोहर सहारा इंग्लिश स्कुल या खासगी शाळेत सचिव आहे, त्या शाळेचीही माहिती ‘आरटीआय’अंतर्गत प्राप्त करून ३१ मे २०२३ रोजी २५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने शाळेची खोटी बातमी लावून बदनामी केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्रकार रवि इंगळे याच्यावर भादंविचे कलम ३८४, ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला. याशिवाय इंगळेकडून १० हजारांची रक्कमही जप्त करण्यात आली. पुढील तपास सपोनि शिवचरण डोंगरे करित आहे.