मागील काही दिवसांपासून सतत पडणारा पाऊस, सतत सुरू असलेला विजेचा लपंडाव, रस्त्यावर वाहणाऱ्या नाल्या, गटारांचे पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांचे निर्मूलन करण्यासाठी कुठल्याच उपाययोजना होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे गावात डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ग्रामस्थांसह, लहान मुलांत या आजाराचे प्रमाण वाढत असून, त्यांना खासगी दवाखान्यांत उपचार घ्यावे लागत आहेत. दरम्यान, मोप प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डाॅ. आशिष सिंह, डाॅ. गजानन पद्मणे, डाॅ. स्मिता बबेरवाल, आरोग्यसेविका कऱ्हाड, आरोग्यसेवक डोंगरे, मोरे, भगत, आशासेविकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबास भेट देत जंतुनाशक, टेमोफाॅस फवारण्या करण्यात आल्या, तर घरातील सांडपाणी साचून राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गटाराचे पाणी रस्त्यावर
गावातील नाल्या तुडुंब भरल्याने नाल्या, गटारांचे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढून, साथरोगांना आमंत्रण मिळत आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष देत ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शिवाय विजेचा वेळी, अवेळी लपंडाव सुरू असून, सोसाट्याचा वारा सुटत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
--------
कोट : भर जहागीर येथे हिवतापाचे काही रुग्ण आढळल्याने ग्रामस्थ आरोग्य विभागाकडून घरोघर तपासणी करण्यासह ग्रामस्थांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यासह, विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
-डाॅ. आशिष सिंह,
वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र, मोप