लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली आहे. जवळपास १o ते १२ जणांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, त्यातील सहा जणांवर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करावे लागलेे. त्याशिवाय हिवतांप, अतिसार आणि सर्दी खोकल्याच्या आजारांचाही येथे प्रादूर्भाव आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिनाभरापासून इंझोरी येथे साथरोगांचा प्रादूर्भाव झाला असताना आरोग्य विभागाकडून अद्यापही या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रभावी उपाययोजना राबविण्यात आली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात वारंवार आरोग्य विभागाला माहिती देऊन उपचार सुविधा उपलब्ध करण्यासह तपासणी शिबिर राबविण्याची मागणीही केली. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. इंझोरी परिसरात दिवसभर रखरखते उन्ह आणि रात्री वातावरणात मोठा गारवा निर्माण होत आहे. या विषम वातावरणामुळेच गावात साथरोगांनी तोंड वर काढले आहे. बहुतांश घरात कुठल्या न कुठल्या आजाराची लागण झालेली व्यक्ती आढळते. सर्दी, ताप, खोकला, अतिसार, मलेरिया, विषमज्वर या आजारांसह डेंग्युसदृश आजारांनी तोंड वर काढले आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराची लागण झाली आहे. त्यातच डेंग्युसदृश आजाराची लागण सहा जाणांना झाली आहे. स्थानिक व तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालयात उपचार करुनही आजार बरा होत नसल्याने या रुग्णांनी अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली आहे.
इंझोरीत डेंग्युसदृश आजाराची साथ; विषमज्वर, हिवताप, अतिसाराचाही प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 4:09 PM