वाशिम : अन्य राज्यात ‘बर्ड फ्लू’चे संकट असून, जिल्ह्यात तूर्तास कोणताही धोका नाही. खबरदारीचा प्रयत्न म्हणून पशुसंवर्धन विभागातर्फे दक्षता घेतली जात आहे.
राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशात बर्ड फ्लूने पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. विदर्भात सध्या बर्ड फ्लूचे संकट आले नाही. जिल्ह्यात सध्या बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही; परंतू आगामी काळात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. दुसरीकडे बर्ड फ्लूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसाय करणारे अडचणीत सापडत असल्याचे दिसून येते. परराज्यातून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. परराज्यातील संशयित क्षेत्रावरून जिल्ह्यात पक्ष्यांची वाहतूक होत नसल्याने तूर्तास भीतीचे कोणतेही कारण नाही. आगामी काळात संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक जिल्ह्यात होणार नाही, या दृष्टीने पशुसंवर्धन विभागातर्फे नियोजन केले जात आहे. दक्षता म्हणून निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्याचा विचारही केला जात आहे.
००
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
परराज्य तसेच संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक जिल्ह्यात होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा सध्या कोणताही धोका नसला तरी मृत पक्षी कुठे आढळून तर आला नाही ना? या दृष्टिकोनातूनही पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन माहिती घेण्यात येत आहे.
००००
मृत पक्षी आढळल्यास तात्काळ कळवा
बर्ड फ्लू हा सर्दीसारखा आजार आहे. जिल्ह्यात सध्या कोणताही धोका नाही. खबरदारी म्हणून कुठे मृत पक्षी आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
०००
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा सध्या तरी कोणताही धोका नाही. जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव होऊ नये म्हणून आवश्यक ती दक्षात घेण्यात येत आहे.
- डाॅ. भुवनेश्वर बोरकर
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त