गेल्या दोन महिन्यापासून खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हात रोजगार बुडवून आबालवृद्धांना पाण्यासाठी दोन किमी अंतरावर भटकंती करावी लागत आहे. डोईवर पाण्याचे हंडे घेऊन घाटरस्ता चढताना वयोवृद्ध व महिला वर्गाला अत्यंत त्रास सहन करावा लागतो. जलस्वराज्यची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा रानोमाळ भटकंती करूनही शुद्ध पाणी मिळत नसल्याने दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. प्रशासनाने डव्हा गावानजीकच्या चाकातीर्थ संग्राहक तलावातून अथवा सुदी गावाजवळील संग्राहक तलावातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केल्यास निश्चितच येथील जनतेची कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली निघू शकते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, उपअभियंता मुकुंदराज आंधळे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सद्यस्थितीत टॅंकरद्वारा तात्काळ पाणीपुरवठा करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.
..
कोट
खैरखेडा येथील पाणी समस्येची पाहणी केली आहे. कायमस्वरूपी समस्या निकाली काढण्यासाठीच्या उपाययोजनेबाबत ग्रामस्थांशी चर्चा सुद्धा केली आहे. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.
- मुकुंदराज आंधळे,
उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग