लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम अथवा इतर कौटुंबिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात आमदार निधीतून करोडो रुपये खर्चून सामाजिक सभागृहे उभारण्यात आली. विद्यार्थी, तरूणांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळा उभारल्या; मात्र, यातील बहुतांश वास्तूंची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. जिल्ह्यातील शंभरावर सामाजिक सभागृहे सद्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कचरा, धूळ, स्वच्छतागृहांची दुरवस्था, खिळखिळीत झालेल्या खिडक्या अशी अवस्था या सभागृहांची झाली आहे.जिल्ह्यातील गावांमध्ये आमदार निधीतून सामाजिक सभागृह, सिमेंट रस्ते, व्यायामशाळा, स्मशानभूमी, शाळा खोली विशेष दुरूस्ती आदी कामे करण्यात आली. त्यातील सामाजिक सभागृहांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. गावातील कुठलेही मंगलकार्य साजरे करण्यासाठी गावकऱ्यांना हक्काचे व सुविधांनी सज्ज ठिकाण म्हणून या सभागृहांचा वापर होणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात मात्र तुलनेने जुन्या झालेल्या अनेक ठिकाणच्या सभागृहाची मोठ्या प्रमाणात पडझड होण्यासोबतच काही ठिकाणी सभागृहांचा वापर चक्क गुरांचा गोठा म्हणून केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. काही सभागृहांसभोवताल कचºयाचे ढीग साचत असल्याने मूळ उद्देशांना हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सभागृहांची डागडूजी, दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या सामाजिक सभागृहांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना लग्नसोहळ्यांसह इतर काही कार्यक्रम घेताना अडचण जात आहे. अशा स्थितीत सभागृहांच्या डागडूजी, दुरूस्तीकडे प्रशासनाने लक्ष पुरविल्यास ग्रामस्थांची होणारी गैरसोय टळू शकते. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाचे या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात उभारण्यात आलेली अनेक ठिकाणची सामाजिक सभागृहे सद्य:स्थितीत जुनी झाली असून आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून त्याचा वापर केला जात नाही. प्रशासनाने सभागृहांच्या दुरूस्तीकडे लक्ष पुरविल्यास चित्र बदलू शकते.- प्रदिप शिंदे, पांगरखेडा (ता.मालेगाव)
आमदार निधीमधून दरवर्षी इतर कामांसोबतच मागणीप्रमाणे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सभागृह उभारण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी ही सभागृहे सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.- भारत वायाळजिल्हा नियोजन अधिकारी, वाशिम