लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: उन्हाळ्यांच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करणाºया वन्यप्राण्यांचा जीव संकटात येऊ नये म्हणून वाशिम जिल्ह्यातील जंगलात मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी केला आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील जंगलात प्रत्येकी ७ हजार रुपये खर्चून शेकडो पाणवठे तयार केले जाणार आहेत.वाशिम जिल्ह्याचा बहुतांश भाग वनक्षेत्राने वेढला आहे. उष्णकटीबंधीय या भागांतील जंगलात पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच या जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडतात. त्यामुळे या जंगलातील विविध वनप्रजांतींच्या पशू, पक्ष्यांना पाण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागते आणि त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो. यामुळे वन्यप्राण्यांसह माणसाच्या जिवालाही धोका आहे. त्याशिवाय रस्त्यावर सैरावैरा धावताना वन्यप्राणी अपघाताला बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारांतून अनेक वन्यप्राण्यांचा जीवही गेला, तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेक लोेक गंभीर जखमी झाले आहेत. ही समस्या लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी त्यांच्या वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सहकार्याने लोकसहभागातून जंगलात पाणवठे तयार करण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी उपवनसंरक्षक वाशिम यांना पत्र सादर करून लोकसहभागातून जंगलात पाणवठे तयार करण्यासाठी परवानगी मागितली आहे. विटा, सिमेंट, मजुरी, खडी आणि ग्रीन नेटसह इतर खर्च मिळून सात हजार रुपयांत एक पाणवठा या अभियानातून तयार होणार असून, असे शेकडो पाणवठे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील जंगलात त्यांच्यावतीने तयार केले जाणार आहेत. उपवनसंरक्षकांकडून निर्णयाचे समर्थनवाशिम जिल्ह्यातील जंगलात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच जलसाठे आटतात, तर हतर पर्यायी व्यवस्थाही नाहीत. अशात वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने लोकसहभागातून जंगलात पाणवठे तयार करण्याची तयारी दर्शविली असून, त्यांच्या या निर्णयाचे उपवनसंरक्षकांनी समर्थन करीत त्यांना जंगली भागांत पाणवठे तयार करण्यास परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जंगलातील जिवांसाठी लवकरच पाणवठे तयार करण्याचे कामही सुरू होणार आहे.
लोकसहभागातून पाणवठे तयार करण्याचा निर्धार ; वन्यजीवप्रेमींचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 2:23 PM