वाशिम - मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून एक हजार गावे विकसित करणे या मिशनच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’(व्हीएसटीएफ) अर्थात ‘ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत गावांचा शाश्वत विकास घडविण्यात येणार असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील निवडक गावांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे.
शासनाचा निधी, कार्पोरेट कंपन्यांची कार्यकुशलता, लोकसहभाग, व्यावसायिक दृष्टीकोन व तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणातून विकासापासून दूर राहिलेल्या खेड्यांचा विकास करण्याचे काम ग्रामीण विकास फेलोशिपद्वारे करण्यात येत आहे. ग्राम परिवर्तकांच्या मार्फत खेड्यांचा शाश्वत विकास घडवून ग्रामपरिवर्तनाची चळवळ गतीमान केली जाणार आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामपरिवर्तनाची चळवळ साकारली आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या मदतीसाठी कॉपोर्रेट क्षेत्र पुढे सरसावल्याने ही चळवळ अधिक गतीमान होताना दिसत आहे.
खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभागातून ग्रामविकास आराखडा निर्माण केला जाणार आहे. ग्रामसभेत आराखड्याला मंजुरी घेऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक मंजुरी देण्यात येणार आहे. सदर आराखड्याची कामे विविध शासन योजनेतून सांगड घालून करण्यात येणार आहेत. सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी सरकारची विविध खाती, विविध उद्योगसमूह, स्वयंसेवी संस्था व लोकसहभाग यातून सर्वांगीण विकासाचे मॉडेल राबविणारी ही योजना आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, स्वच्छता, मलनि:सारण, शेती, प्रशिक्षण, घरकुल योजना, दुर्गम भागात विजेची सुविधा, डिजीटल कनेक्टीव्हिटी, कौशल्य विकास, जलसंचय या मुख्य मानव विकास निर्देशांंवर भर दिला जाणार आहे. राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमाच्या (सी.एस.आर.) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासह ही गावे शाश्वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांशी उपक्रम ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून राबविण्यात येत आहे.
विविध सामाजिक आव्हानांना तोंड देणा-या खेड्यांचे रुपांतर आदर्श गावांत करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानासाठी संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, कार्यकारी मंडळ, यांची स्थापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री ग्रामीण फेलोशिप कार्यक्रमांतर्गत ग्रामपरिवर्तकांची निवड करण्यात आली आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्राम विकास विभाग नोडेल एजन्सी म्हणून काम पाहत आहे.