अकोला-आर्णी या राज्यमार्गाच्या दर्जा वाढ करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए मागील दोन वर्षापासून सर्जन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरएनएस, इन्फ्रा कंपनीकडून निर्माण करण्यात येत आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या महामार्गाच्या बांधकामापूर्वी नाहरकत देताना जनतेचे आरोग्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक अटी घातल्या आहेत. तथापि, पर्यावरण मंत्रालयाच्या अटींचे सर्रास उल्लंघन सर्जन आणि आरएनएस इन्फ्रा. कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती, उपविभागीय अभियंता, यवतमाळ यांच्याकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या उपद्रवामुळे नागरिकांचे आणि विशेषतः मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात आल्याने या बेकायदेशीर कामास तात्काळ पायबंद घालण्यासाठी गैरअर्जदार कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याविरोधात तातडीने आदेश पारित होणे अगत्याचे आहे.
मानोरा तालुक्यातील या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सिंगडोह, साखरडोह, हळदा, कोलार, आमगव्हाण, मानोरा, विठोली, बेलोरा, चाकूर, माहुली, हातना, पंचाळा, वाईगौळ, सावळी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक धुळीच्या प्रचंड लोटाने पूर्णपणे काळवंडत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले आहे.
----------
कोट: निर्माणाधीन महामार्गावरील मातीचे लोट उभ्या पिकांवर साचत असल्याने पांढरे शुभ्र कपाशीचे पीक मातीमोल झालेले आहे. पाच हजाराच्या वर क्विंटलला दर मिळणाऱ्या कपाशीला कंपनीच्या हलगर्जीपणामुळे धुळीने माखल्याने या शेतकऱ्यांचे कापूस कोणी दोन हजार रुपये क्विंटल दराने घ्यायलाही तयार नाही.
रोहिदास नागोराव पवार,
शेतकरी, मानोरा