लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येत्या ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात आगळेवेगळे महत्त्व असलेल्या या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावागावातील उमेदवार जोमाने प्रचार कार्यात भिडले आहेत. यादरम्यान जवळचे कार्यकर्ते तथा मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळींचे कार्यक्रम होत असून, महामार्गानजिकचे ढाबे, रेस्टॉरंटमध्येही यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर २0१७ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यात २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा ५३, मालेगाव ४८, रिसोड ४५, मानोरा ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी वाशिम तालुक्यातील सरपंच पदाच्या ९४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. सदस्य पदाच्या २२४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ७१५ उमेदवार कायम आहेत. मानोरा तालुक्यात सरपंच पदाकरिता दाखल १८५ अर्जांपैकी ५0 जणांनी माघार घेतली; तर सदस्यपदासाठी दाखल ६५९ अर्जांपैकी ९0 उमेदवार माघारी फिरले. कारंजा तालुक्यात सरपंच पदाच्या २३७ पैकी ५६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदाच्या ७३९ उमेदवारांपैकी ७३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मालेगाव तालुक्यात सरपंच पदाच्या २४२ पैकी ८७; तर सदस्य पदाच्या ८२२ पैकी १६८ जणांनी माघार घेतली. रिसोड तालुक्यात सरपंच पदाच्या २00 अर्जांपैकी ६४ आणि सदस्य पदाच्या ७९९ अर्जांपैकी १६७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे; तर मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदाच्या ७९; तर सदस्य पदाच्या १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता शिल्लक राहिलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच ठिकाणच्या उमेदवारांनी साम-दाम-दंड-भेद ही नीती अवलंबून प्रचारकार्याला वेग दिला आहे. यानुषंगाने मर्जीतील कार्यकर्ते आणि मतदारांवर प्रचंड प्रमाणात खर्चदेखील केला जात असून शेतशिवारांमध्ये जेवणावळीचे कार्यक्रम उरकले जात आहेत. गावापासून जवळच्या महामार्गावरील ढाबे आणि रेस्टॉरंटलाही निवडणुकीच्या निमित्ताने सुगीचे दिवस प्राप्त झाले असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंतही गर्दी ओसरत नसल्याचे दिसून येत आहे.
प्रचार यंत्रणा झाली ‘हायटेक’!सद्य:स्थितीत शहरीच नव्हे; तर ग्रामीण भागातही अनेकांकडे ‘अँन्ड्राईड मोबाईल’ असून फेसबुक, व्हाट्स अँपचा वापर वाढला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचारकार्यासाठी त्याचा प्रभावी वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांकडून आयोजित केल्या जाणार्या ‘कॉर्नर मिटींग’ असोत अथवा जेवणावळींचे कार्यक्रम, त्याचे निमंत्रण चक्क व्हाट्सअँपच्या माध्यमातून देणे सुरू असल्याने प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांच्या गोटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सुकर झाले आहे. पर्यायाने ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान गटातटात उद्भवणार्या वादावरही यामुळे यंदा सोयिस्कररीत्या पांघरूण घातले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.