मूर्तिजापूर-धनज या मार्गावर एसटी बसला एकूण सात थांबे आहेत. या मार्गावर, भामदेवी, पिंप्री मोडक, लाडेगाव, कामरगाव या गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ एसटी बसने धनज येथे शाळेत येतात. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एसटीच्या उत्पन्नात मोठी भरही पडते. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाने एसटीची प्रवासी वाहतूक बंद केली होती. त्यात मूर्तिजापूर-धनज ही बसफेरीही बंद झाली. कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शासनाने सुरुवातीच्या काळात निम्म्या प्रवासी संख्येने, तर नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतने एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यास मुभा दिली. आता एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत होऊन तीन महिने उलटले असून, प्रवाशांचा प्रतिसादही लाभत आहे. त्यामुळे मूर्तिजापूर-धनज ही बसफेरी सुरू होणे अपेक्षित आहे; परंतु अद्यापही ही बसफेरी सुरू करण्यात आली नाही. आता बसफेरी बंद असल्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना अन्य कुठलाही पर्याय नसल्याने ते ऑटोरिक्षा, काळीपिवळी या खासगी वाहनांचा आधार घेत असून, खासगी वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघाताची भीती असल्याने मूर्तिजापूर-धनज ही बससेवा सुरू करण्याची मागणी, मागणी धनज, भामदेवी, पिंप्री मोडक, लाडेगाव, कामरगाव येथील प्रवासी करीत आहेत.
नऊ महिन्यांपासून धनज-मूर्तिजापूर एसटी बसफेऱ्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 9:21 AM