- संतोष वाखनडेवाशिम - पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये या मागणीसाठी शाळा बचाव समितीसह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
राज्य सरकारने जनतेवर ज्ञानबंदी लादण्यासाठी जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा कुटिल डाव आखला जात आहे, असा आरोप करीत हा डाव उधळून लावण्यासाठी धरणे आंदोलन केल्याचे यावेळी शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची माहिती शासनाने मागविल्याने या शाळा बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा या आदिवासी पाडे, दुर्गम भागातील मुला -मुलींच्या शिक्षणासाठी सुरू आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे त्या शाळा बंद झाल्यास मुले शाळाबाह्य होण्याची भीती आहे. शिक्षण हे मूलभूत गरजांमध्ये येत असल्यामुळे शासन याबाबतीत असा निकष कसा काय लावू शकते ? असा प्रश्न उपस्थित करीत पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शाळा आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचा निषेध, शाळा वाचवा-शिक्षण वाचवा, अश्या विविध घोषणा देवून शाळा वाचविन्याचा आवाज बुलंद करण्यात आला. या आंदोलनात बंद होणार्या शाळांचे सुरकंडी बू. ,मसला बू., झोडगा बु. एकलासपुर , सरपखेड व ईतर काही शाळांचे विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.