पोहा येथील विजय कळणुजी आमटे यांचे सर्वे क्रमांक २७३ मध्ये शेत आहे. या शिवारात खरिपाची पिके बहरली असून, या पिकांंत वन्यप्राणी चारापाण्याच्या शोधात भटकत आहेत. हे प्राणी खरीप पिकांत धुडगूस घालून शेतकऱ्यांचे नुकसानही करीत आहेत. अशात सोमवार १२ जुलै रोजी रात्री निलगाईचा कळप चारापाण्याच्या शोधात भटकत असताना त्यातील एक निलगाय विजय आमटे यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. विजय आमटे हे १४ जुलै रोजी शेतात गेले असता त्यांना विहिरीत मृतावस्थेतील निलगाय दिसली. त्यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक केंद्रे हे वनकामगार रमजान नौरंगाबादी, गोवर्धन चौरकर, उद्धव चव्हाण व वाहनचालक आकाश गुल्हाने यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर निलगाईला बाहेर काढण्यात आले. यावेळी विजय आमटे, भगवान आमटे, परशराम आमटे, भुषण कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
-------
वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
खरीप पिके बहरत असताना वन्यप्राणी शिवारात हैदोस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. यंदा पावसाचा खंड, बियाणे, खतांची दरवाढ, बियाण्यांचा तुटवडा, पीक कर्जास विलंब, डिझेल दरवाढ आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता वन्यप्राण्यांनी खरीप पिकांचे नुकसान चालविल्याने शेतकरी अधिकच त्रस्त झाले असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.