मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यात अतिसाराची साथ पसरली असून, तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात कोणत्याच आजाराची साथ पसरु नये, तसेच आजाराची साथ पसरु नये यासाठी आरोग्य यंत्रणा सजग असते; मात्र सद्यस्थितीत तालुक्यातील अनेक गावात अतिसाराची साथ पसरली असून या आजारामुळे अनेक रुग्ण त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. मागील १५ वर्षापूर्वी शहरात अतिसाराची साथ पसरली होती. त्यावेळी तब्बल २00 रुग्णांना या आजाराची लागण झाली होती. त्यापैकी एका रुग्णाचा या आजारामुळेच मृ त्यूही झाल्याची घटना घडली होती. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे ऐन वेळेवर औषधी साठा अपुरा पडल्याने परजिल्हयातून औषधी साठा मागविण्यात आला होता. त्यामुळे साथ आटोक्यात आली होती. यावेळी डायरीयाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी आरोग्य यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. ही साथ नियंत्रणात आली नाही तर रुग्णाची संख्या वाढू शकते. तालुक्यात आरोग्य विभागाचा समन्वय नाही,याशिवाय अनेक आरोग्य केंद्रात विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णाला उपचारासाठी शहरी भागातील रुग्णालयाकडे जावे लागते. यामध्ये पैसा व श्रम याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. आरोग्य विभागाने पावसाळयापूर्वी विविध आजाराबाबत जनजागृती मोहीम राबविणे अनिवार्य असतांना याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांची संखा वाढतच असून जांब ३, शहापूर ७, सायखेडा २, खापरदरी ४, मोहरी २, निंबी ३, गोकवाडी ३, चांभई २, चिखलागड १, लावना २, बालदेव १, मसला २, धानोरा ४ यासह शहरातील २५ रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणार्या अतिसाराच्या रुग्णासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी गोरगरीब रुग्णांच्या वतीने करण्यात येत असून, त्याकडे संबंधित अधिकार्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
मंगरुळपीर तालुक्यात अतिसाराची साथ
By admin | Published: July 15, 2015 1:41 AM