कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाकडून संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे जवळपास सर्वच उद्योगधंदे ठप्प होते. या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने गरीब व गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यात संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचे ई-पाॅस मशीनवर अंगठे घेऊन लाभार्थींना धान्य वितरण करण्यात आले, तर जून महिन्यापासून लाभार्थींचेच अंगठे ग्राह्य धरले जात असून, यामाध्यमातून धान्य वितरण केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र धान्यवाटपाची गती कमी असल्याने अनेक लाभार्थींना अद्यापपर्यंत मोफत धान्याचा लाभ मिळालेला नाही.
........................
एकूण रेशनकार्डधारक - २,५५,९५३
अंत्योदय - ४८,३२१
केशरी - १,७७,६९४
शेतकरी - २९,९३८
..............
शासनाकडून आलेले मोफत धान्य मिळाले
मोफत धान्य वितरण करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. मे महिन्यात उशिराने धान्य मिळाले. जून महिन्यात मात्र परिस्थिती सुरळीत झाली. मला या योजनेअंतर्गत मोफत धान्याचा लाभ मिळालेला आहे.
- छाया इंगोले
.......................
शासनाकडून रेशनकार्डधारकांना मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मे महिन्यात ग्रामीण भागात ही प्रक्रिया संथ गतीने राबविण्यात आली. जून महिन्यात मात्र लवकरच धान्य उपलब्ध झाले.
- बेबीबाई खडसे
....................
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प होते. त्यामुळे हाताला काम मिळाले नाही. अशात शासनाने मोफत धान्य उपलब्ध करून दिले. मे आणि जून या दोन्ही महिन्यात दगडउमरा येथे लाभार्थींना त्याचा लाभ मिळालेला आहे.
- गजानन पाठे
...........................
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या अखेरपर्यंत ई-पाॅस मशीनवर स्वस्त धान्य दुकानदारांचाच अंगठा ग्राह्य धरला जात होता. जून महिन्यापासून मात्र पूर्वीप्रमाणेच लाभार्थींचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लाभार्थींनी कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी धान्य घेतल्यानंतरच ई-पाॅस मशीनवर अंगठा देणे आवश्यक आहे.
..............
कोट : जिल्ह्याला मोफत धान्य योजनेंतर्गत मे व जून महिन्यात प्रत्येकी ४,९५० मे.टन. गहू व तांदळाचे नियतन मंजूर झाले होते. रास्त भाव दुकानदारांमार्फत त्याचे वितरण करण्यात आले. काही ठिकाणी वाटपास विलंब झाला; मात्र आता प्रक्रिया सुरळीत झाली आहे.
- संदीप महाजन
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम