संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने बालकांना ‘फ्ल्यू’ची लस देण्याकडे काही पालकांचा कल दिसून येतो, तर काही पालक बिनधास्त आहेत. दरम्यान, रुग्णालय बदलेल तशी ‘फ्ल्यू’ लसीची किंमतही बदलत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. या लसीची मूळ किंमत नेमकी किती, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.देशात मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत १८ तसेच १० वर्षांआतील मुलांना फारसा कोरोना संसर्ग झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र १८ वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग झाला. दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने, थोडी धाकधूकही कायम आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोगतज्ज्ञांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला. कोरोनापासून बालकांचा बचाव म्हणून इन्फ्लुएन्झा लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्स व पीडियाट्रिक टास्क फोर्सने दिलेला आहे. कंपनीनुसार या लसीच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. ही लस दोन प्रकारची असून, एका लसीची किंमत १२००, तर दुसऱ्या लसीची किंमत १८०० रुपये अशी आहे. मात्र या किमती जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांत समान नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले. किमती समान नसल्याने पालकांमध्येही संभ्रम आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात लसीची किंमत समान असावी, म्हणून दरपत्रक लावण्यात यावे, असा सूर पालकांमधून उमटत आहे.
एका रुग्णालयात १८०० तर दुसऱ्या रुग्णालयात लसीची किंमत दोन हजार रुपये इन्फ्लुएन्झा लस ही दोन प्रकारे असून, वाशिम येथील एका रुग्णालयात पहिल्या लसीची किंमत १२०० रुपये, तर दुसऱ्या लसीची किंमत १८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. पालकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.वाशिम येथील एका रुग्णालयात पहिल्या लसीची किंमत १४०० रुपये, तर दुसऱ्या लसीची किंमत १८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. बालकांना लस देण्याबाबत पालकांचा प्रतिसाद संमिश्र असल्याचे सांगण्यात आले.वाशिम येथील एका रुग्णालयात विचारणा केली असता, एका लसीची किंमत १८००, तर दुसऱ्या लसीची किंमत २००० रुपये असल्याचे सांगण्यात आले. सुशिक्षित, नोकरदार वर्गातील पालकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी असल्याचे दिसून आले.वाशिम शहरातील एका रुग्णालयात २०२० मधील लस ही १२०० रुपये, तर २०२१ मधील लसीची किंमत १८५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. पालकांचा प्रतिसाद मात्र अल्प प्रमाणात मिळत असल्याचे सांगितले.
बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी याकरिता लसीकरण महत्त्वाचे आहे. कंपनीनुसार ‘फ्ल्यू’ लसीच्या किमती बदलतात. एकाच कंपनीची विशिष्ट लस समान किमतीत सर्वत्र उपलब्ध व्हावी. याबाबत माहिती घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील.- डॉ. मधुकर राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.