शिरपूर जैन: सामाजिक वनीकरण विभागाकडून शिरपूर येथे पोलीस स्टेशन ते मालेगाव-रिसोड या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तथापि, रस्त्यापासून वृक्षांचे अंतर कमी असल्याने ही वृक्ष लागवड पुढे अडचणीची ठरून शासनाच्या निधीचा यामुळे अपव्यय होण्याची शक्यता आहे.
सामाजिक वनीकरण विभागाकडून गत पावसाळ्यानंतर मालेगाव तालुक्यात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शिरपूर पोलीस स्टेशन ते मालेगाव-रिसोड या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. ही वृक्ष लागवड करताना रस्त्यापासून वृक्षांचे अंतर फारसे दूर ठेवण्यात आले नाही. अगदी मार्गालगतच ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आता या वृक्षांचे संगोपन करून ते वाढविण्यासाठी सामाजिक वनीकरणची धडपडही सुरू आहे. त्यासाठी मजुर लावून झाडांना दरदिवशी पाणी घातले जात आहे. या उपक्रमामुळे वृक्षांची वाढ होणार आहे; परंतु भविष्यात वाढलेले हे वृक्ष रस्त्यावरील वाहतुकीसाठी अडथळा ठरण्याची दाट शक्यता असल्याने ते कापावे लागणार आहेत. यामुळे वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून खर्च करण्यात आलेल्या शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याची भीती आहे.
-------
२३८ रुपये मजुरीने पाच कामगार
शिरपूर पोलीस स्टेशन ते मालेगाव-रिसोड मार्गावर लावण्यात आलेले वृक्ष जगविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने पाच कामगार लावून झाडांना पाणी घालणे सुरू केले आहे. यासाठी प्रत्येक कामगाराला २३८ रुपये रोजप्रमाणे मजुरी दिली जात आहे. अर्थात सामाजिक वनीकरणचा उपक्रम चांगला असला तरी यावर करण्यात येत असलेला खर्च वायफळच ठरणार आहे.