- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य वखार महामंडळाच्या वाशिम युनिटमधील गोदामांत धान्य साठविण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यातच दोन गोदामांची दुरुस्ती सुरु असल्याने नाफेडच्या हमीभावाने तूर खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणारी तूर साठविण्याची पंचाईत झाली आहे.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, वाशिम आणि मंगरुळपीर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळांची गोदामे आहेत. या सर्व गोदामांत मिळून २४ हजार ३४० मेट्रिक टन धान्य साठविण्याची क्षमता आहे. त्यापैकी मालेगाव येथील ३ गोदामांत ४ हजार ७२०, मंगरुळपीर येथील ५ गोदामांत ७ हजार ९००, रिसोड येथील दोन गोदामांत २०००, तर वाशिम येथील सहा गोदामांत ९७९० मेट्रिक टन धान्य साठविले जाऊ शकते. आता यंदाच्या खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील उत्पादित मालाची प्रचंड आवक बाजारात सुरु असून, यातील बहुतांश शेतमाल हा वखार महामंडळाच्या गोदामांतच साठविण्यात येतो. त्याशिवाय अनेक शेतकरी अल्पदरामुळे शेतमालाची विक्री थांबवून तो शेतमाल शासकीय गोदामांत ठेवतात. यंदाही सोयाबीन वगळता प्रत्येक शेतमालास बाजारात अल्पदर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल शासकीय गोदामांत साठवून ठेवला आहे. त्यामुळे या गोदामांत आता साठवणुकीसाठी फारशी जागा उरलेली नाही. त्यातच वाशिम येथील सहापैकी चार गोदामांची साठवणूक क्षमता संपली असून, इतर दोन गोदामांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे नाफेडच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची पंचाईत झाली आहे. शासनाने नोंदणीची अट शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात ३३ हजार ६२ शेतकऱ्यांनी २९ फेब्रुवारीपर्यंत तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ९१७ शेतकºयांकडील ८ हजार ७०५ क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली आहे. शासकीय गोदामांत साठवणुकीसाठी जागाच नसल्याने नाफेडच्या खरेदीदार संस्थानांही खरेदीत अडचणी येत आहेत.
वाशिम येथील खरेदी बंदवखार महामंडळाच्या वाशिम येथील ४ गोदामांत साठवणुकीसाठी जागाच उरली नसल्याने आणि उर्वरित दोन गोदामांची दुरुस्ती सुरु असल्याने सोमवारी नाफेडच्या वाशिम येथील खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी बंद ठेवण्यात आल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली. वाशिम तालुक्यात ८ हजार ११ शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी २९ फेब्रुवारीपर्यंत केवळ ६०९ शेतकºयांच्या ५ हजार ५७० क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली आहे. आता गोदामांत साठवणुकीसाठी जागाच नसल्याने पुढे खरेदीत अनेक अडचणी येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.