वाशिम : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत सर्व व्यावसायिक दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक सुरुवातीला मराठीत असणे आवश्यक आहे. अनेक आस्थापनांनी अधिनियमाची अंमलबजावणी केली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पथकांकडून अशा आस्थापनांवर धडक देऊन इंग्रजी पाट्या असणाऱ्या २० दुकानमालकांना मंगळवारी (दि.१९) नोटीस बजावली.
प्रत्येक दुकानाच्या नामफलकावर सुरुवातीला मराठीत नाव असणे आवश्यक आहे. अशा तरतुदीची महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापना किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. शिवाय तो दर्शनी भागात असावा, मराठी भाषेत पाट्या असाव्यात, असा नियम असला तरी अनेक दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करतात. इंग्रजीमध्ये पाट्या लावण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच ठिकाणच्या आस्थापना आणि दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना, दुकानांची पाहणी करून सुरुवातीला मराठी नाव नसलेल्या दुकानदारांना नोटीस बजावून तातडीने पाटी मराठीत करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.