मानाेरा : शहर आणि तालुक्यामध्ये ७ जून राेजी झालेल्या पावसाने मानोरा शहरातील बहुतांश वार्डामधील साफसफाई न केल्यामुळे तुंबलेल्या नाल्यातील घाण रस्त्यावर आल्याने प्रचंड घाणीचा सामना शहरवासीयांना करावा लागला.
एकीकडे तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या पावसामुळे हसू दिसत होते तर दुसरीकडे न.पं.च्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांत राेष व्यक्त केल्या जात हाेता. मानोरा शहरात पहिल्याच पावसाने जागोजागी नाल्या, गटारी तुंबल्याने नगरपंचायतचे काम दिसून येत हाेते. मानोरा शहरवासीय एकीकडे मागील एक वर्षापासून कोरोना महामारीचा मोठ्या धैर्याने आणि शासकीय नियम व अटींचे पालन करून सामना करीत असताना मात्र न.पं. प्रशासन स्वच्छता विषयक बाबींकडे दुर्लक्ष करून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात घालीत असल्याच्या भावना यावेळी संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पहिल्याच पावसात शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असताना पुढे येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांचे काय हाल होतील यासंबंधी आतापासूनच नागरिक तर्कवितर्क लढवत आहेत.