वाशिम: शासनाने दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी संगकीय तपासणीची पद्धती लागू केली आहे; परंतु या पद्धतीचाही पार बोजवारा उडत असून, वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी झाल्यानंतरही दिव्यांगांच्या प्रमाणपत्रावर दोन महिन्यांहून अधिक काळ डॉक्टरांची स्वाक्षरीच होत नसल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी शेकडो दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येरझारा घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दिव्यांगांची नोंदणी करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी देण्यात येणाºया प्रमाणपत्रात मोठा घोळ होत असल्याच्या तक्रारी शासनदरबारी सातत्याने झाल्या होत्या. या पृष्ठभूमीवर शासनाच्या आरोग्य विभागाने दिव्यांगांची संगणकीय तपासणी करण्याची पद्धती लागू केली. या पद्धतीनुसार विविध विक लांगांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी अर्ज करावा लागतो. आधीच मनुष्यबळ अपुरे असल्याने तपासणीसाठी दिव्यांगाना येथे वेळोवेळी येरझारा घालाव्या लागतात. संगणकीय तपासणी झाल्यानंतर दिव्यांगांना किमान आठवडाभरात आॅनलाइन प्रमाणपत्राची प्रत मिळणे अपेक्षीत आहे; परंतु या ठिकाणी संगणकीय तपासणीनंतरही संबंधित डॉक्टरची स्वाक्षरी होण्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागत असल्याचे दिव्यांग बांधवांच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे तपासणीनंतरही प्रमाणपत्रासाठी शेकडो दिव्यांग बांधव गेल्या तीन महिन्यांपासून प्रतिक्षा करीत आहेत.