लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या १० विषय समितीमधील एकूण ८३ सदस्यांची निवड ६ मार्च रोजीच्या विशेष सभेतून झाली खरी; परंतू नाराजीनाट्यामुळे समितीमधील सदस्यांची नावे जाहिर होण्यास रात्री ९.३० वाजेपर्यंत विलंब झाला.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीने भारिप-बमसंला सोबत घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक अविरोध जिंकली. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, कृषी समिती, पशुसंवर्धन समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती, जलव्यवस्थापन समिती अशा १० समिती सदस्यांच्या निवडीसाठी अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या प्रक्रियेवर जनविकास आघाडीचे गटनेते स्वप्नील सरनाईक व भाजपाचे गटनेते उमेश ठाकरे यांच्यासह विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला होता. तेव्हापासून समिती सदस्यांची निवड लांबणीवर पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा अपवाद वगळता अन्य पक्षातील अंतर्गत नाराजीनाट्यामुळे समितीमधील सदस्यांची नावे निश्चित करताना जिल्हा परिषद अध्यक्षांची कसोटी लागली होती. ३१ मार्च लक्षात घेता सन २०१८-१९ या वर्षातील प्रत्येक विभागाचा निधी खर्च होणे आवश्यक आहे. २३ ते ३० लाख रुपयापर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार प्रत्येक विषय समितीला असतात. त्या दृष्टीकोनातून १० समित्या गठीत करण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी स्थगित केलेली विशेष सभा ६ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी निवड प्रक्रिया अविरोध झाली. मात्र, कोणत्या समितीमध्ये कोणत्या सदस्यांना स्थान मिळाले, याची नावे रात्री उशिरापर्यंत जाहिर होत नव्हती. स्थायी समितीत काँग्रेसच्यावतीने कुणाला घ्यायचे, भारिप-बमसं, शिवसेना, राकाँ तसेच विरोधी गटातील जनविकास आघाडी, भाजपाच्या कोणत्या सदस्यांना घ्यावयाचे याचा निर्णय होत नसल्याचे रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, जनविकास आघाडी व भारिप-बमसंच्या पक्ष नेतृत्वाला शेवटी आपापल्या पक्षातील सदस्यांची नाराजी काढण्यासाठी रात्री बराच उशिर झाला. रात्री १० वाजताच्या सुमारास प्रोसेडींगनुसार समिती आणि त्यामधील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली. या वृत्ताला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे. विषय समित्या गठीत झाल्याने आता विशेष सभा बोलाविणे आणि शिल्लक निधीचे नियोजन करण्याचे आव्हान विषय समितीच्या सभापतींसह सदस्यांना पेलावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांची निवड करण्यासाठी यापूर्वी तहकूब केलेली सभा ६ मार्च रोजी घेण्यात आली. यावेळी सर्व संमतीने समिती सदस्यांची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली. रात्री उशिरापर्यंत प्रोसेडींग लिहिण्याचे काम चालले. प्रोसेडींगनुसार कोणत्या समितीत कोणत्या सदस्यांची निवड करण्यात आली, हे नमूद आहे. समित्या गठीत झाल्याने आता पुढील कार्यवाही संबंधित समित्या करणार आहेत.- चंद्रकांत ठाकरेअध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम