युवक काँग्रेसच्या बैठकीत ‘निषेधासन’ आंदोलनावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:40 PM2018-10-30T16:40:41+5:302018-10-30T16:41:09+5:30
वाशिम : स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत युवक काँग्रेसच्या निषेधासन आंदोलनावर चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक विश्रामगृहात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत युवक काँग्रेसच्या निषेधासन आंदोलनावर चर्चा झाली. या उपहासात्क आंदोलनाच्या माध्यमातून ३१ आॅक्टोबरला जिल्हाभरात भाजपा सरकारच्या चार वर्षातील कामकाजाची पोलखोल केली जाणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी दिली.
राज्यातील भाजपा सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने युवक काँग्रेसच्यावतीने विटंबनात्मक योगा करून ‘निषेधासन’ आंदोलन छेडले जाणार आहे. जिल्हाभरात सदर आंदोलन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून शिंदे यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन जबाबदारी निश्चित केली. निषेधासन या अहिंसात्मक आंदोलनाद्वारे सरकार विरोधातील रोष व्यक्त केला जाणार आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, महिला, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी या सर्वांचीच कशी दिशाभूल करण्यात आली, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. निषेधासन आंदोलनात जिल्हाभरात विडंबनात्मक आसनेही केली जाणार आहे. यामध्ये राफेलासन, महागाई आसन, वाचाळासन, भक्तासन, क्लिपचिट आसन, ट्रोलासन, गाजारासन, मौनासन, धमकी आसन, बेरोजगारासन आदी विडंबनात्मक आसनांचा समावेश असून, आंदोलन यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली.