वाशिम : जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांची १८ ऑगस्ट रोजी भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेअंती शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये प्रामुख्याने वाशिम पं. स. मध्ये लिपिक मिळणे, अशासकीय वेतन कपातीचे चेक वितरित करणे, शिक्षकांच्या सर्व्हिस बुकातील वेतनवाढीच्या नोंदीसह व मागील उर्वरित नोंदी घेऊन स्वाक्षरीसह अद्ययावत करणे. शिक्षक पा. सो. महाले यांचे गहाळ झालेले सर्व्हिस बुक त्वरित मिळणे. या मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकारी प्रमोद बदरके, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या समजून घेऊन सदर प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सर्व्हिस बुक अद्ययावत करण्यासाठी ३० ऑगस्टनंतर केंद्रनिहाय शिबिर लावण्यात येतील, असे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर महाले, नारायणराव सरनाईक, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र खडसे, कैसर अहमद, देवीदास महाले, संतोष गावंडे, राजाभाऊ खोटे, गजानन काळे, शेख सफुर, रईस, उमेश पातूकर, जि. प. शिक्षक कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.