राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदेच्या अधिवेशनपूर्व झालेल्या बैठकीत खासदार गवळी यांनी हा प्रश्न मांडला होता. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने ८ एप्रिल रोजी नामदार जयंत पाटील यांनी खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील बॅरेजेसचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यातील मंगरूळपीर तालुक्यामधील अडाण नदीवरील घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा बॅरेज या तिन्ही बॅरेजेसना पाणी उपलब्ध झाल्यानंतर २००८-०९ मध्ये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती परंतु निधीअभावी सदरच्या बॅरेजेसच्या प्रकल्पांची कामे सुरू करता आली नाहीत. ही तिन्ही बॅरेजेस या परिसरातील शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार असल्यामुळे खा. गवळी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये या तीनही बॅरेजेसला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी मंजूर करण्याविषयी निर्णय झाला असून घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा बॅरेजेसला निधी उपलब्धतेकरिता वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याची माहिती खासदार गवळी यांनी दिली आहे. हे तीनही बॅरेजेस काम आता पूर्णत्वाकडे जाऊन मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तसेच रिसोड तालुक्यामधून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर कार्यान्वित असलेल्या बाळखेडा, भापूर, धोडप, मसलापेन, आसेगाव पेन, येवती या सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर व्हावे याकरिता या परिसरातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासून मागणी आता पूर्ण होत आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढल्यानंतर वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून नळगंगा व वैनगंगा या नदीजोड प्रकल्पांच्या पेनटाकळी प्रकल्पातून पाणी घेतल्यामुळे येथील बॅरेजेसवरील शेतकऱ्यांनाही पाण्याची कमतरता भासणार नाही. वाशिम जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे ४८ प्रकल्प असून त्यापैकी १२ प्रकल्प हे अपूर्णावस्थेत आहेत. यावरही चर्चा झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार, लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभागाचे व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:39 AM