वाशिम : पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाला गती दिली आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे सोयाबीन, तूर यासह विविध पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होत असून, कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणीत व्यस्त असल्याचे दिसून येते.
यंदा चार लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी आटोपली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीन आहे. सुरुवातीला सुखद धक्का देणाऱ्या पावसाने जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली होती. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पीक परिस्थिती उत्तम असली तरी वातावरणातील बदलामुळे सध्या सोयाबीन, तूर, कपाशी यासह अन्य पिकांवर विविध प्रकारच्या किडींनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कीड नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. दरम्यान, फवारणीतून विषबाधेचा प्रकार होऊ नये म्हणून नेमकी कोणत्या पद्धतीने फवारणी करावी याबाबत वाशिम पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती दिली जात आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी जनजागृतीवर माहितीपत्रक बनविले असून, गावोगावी त्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाते. कीटकनाशके ही लहान मुले व पाळीव प्राणी यांच्यापासून दूर अशा सुरक्षित जागी ठेवावी. फवारणी/धुरळणी करताना जनावरांच्या चाऱ्यावर ते पडणार नाही याची खबरदारी घ्यावी, फवारणी केलेल्या शेताजवळील गवत, चारा जनावरांना ७-८ दिवस खाऊ घालू नये, असा सल्ला रमेश भद्रोड यांनी दिला.