मूंगळा (वाशिम) - नानाविध संकटांना सामोरे जाणाऱ्या फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना आता संत्रा झाडावरील डिंक्या रोगाने त्रस्त करून सोडले आहे. डिंक्या आजार नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
२०१७ या वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. मुंगळा परिसरात सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाने सरासरी गाठली नाही तसेच पावसात सातत्यदेखील नव्हते. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली. नवीन सोयाबीन बाजारात येताच भावही गडगडले. सुरूवातीला मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करावी लागली. प्रकल्पांत जलसाठा नसल्याने अनेक शेतकºयांना रब्बी हंगामात सिंचन करता आले नाही. परिसरातील सर्व शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. मात्र, पुरेशा पाण्याअभावी रब्बी हंगामही निराशाजनक गेला. अशातच फेब्रुवारी महिन्यात परिसरात अवकाळी पाऊस व गारपिट झाली. यामध्ये फळबागेचे नुकसान झाले. परिसरात नुकसान झालेले असतानाही, संबंधित यंत्रणेने पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकºयांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले. आता संत्रा पिकावर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येते. लिंबुवर्गीय बागेचा ऱ्हास होण्यामध्ये ह्या रोगाचा मोठा वाटा आहे. डिंक्या रोगामुळे उत्पादकता कमी होण्याबरोबरच रोगाच्या तिव्रतेनुसार झाडांचा ऱ्हास होण्याची भीती शेतकऱ्यां मधून वर्तविली जात आहे. या रोगाच्या प्रादुभार्वामुळे झाडाच्या बुंध्याची साल फाटून त्यातून डिंक स्त्रवतो. झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. रोगाची तीव्रता वाढल्यावर जमिनीलगत खोडे कुजतात व रोपे कोलमडून मरतात. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.