रिसोड : रिसोड तालुक्यातील चिखली येथे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतीतर्फे २८ फेब्रुवारी रोजी निर्जंतुकीकरण करण्यात आले.
ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्गाचा शिरकाव होत आहे. तालुक्यातील चिखली येथे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याने आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही, ही बाब गावकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीतर्फे २८ फेब्रुवारी रोजी गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक, सरपंच मनिषा रमेश अंभोरे, उपसरपंच घनश्याम लाड, सदस्य संतुबाई बाबुराव वानखडे, दुर्गा विलास खोरणे, संध्या प्रकाश पारिसकर, भागवत भगत, ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र भगत आदी उपस्थित होते. सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यापुढेही चिखली गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, हात वारंवार धुणे आदींचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.