ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 11 - मंगरुळपीरमध्ये संपूर्ण तालुक्यात ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारे तालुका आरोग्य अधिका-यांचे कार्यालयच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. कार्यालय परिसरात साचलेले पाण्याचे डबके आणि वाढलेली झुडपे यामुळे या कार्यालयातील कर्मचा-यांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मंगरुळपीर येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणि प्रवेशद्वाराजवळच मंगरुळपीरच्या तालुका आरोग्य अधिका-यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात तालुका आरोग्य अधिका-यांशिवाय इतर पाच ते सहा कर्मचारी कार्यरत आहेत. ही सर्व मंडळी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली आरोग्य केंद्रं, आरोग्य उपकेंद्रांतील कर्मचा-यांच्या सेवेसह, औषधांचा पुरवठा, उपलब्धता, लसीकरण मोहीम, विविध आरोग्य शिबिरे, प्रसुतीची आकडेवारी आदी विविध कामांचा लेखाजोखा पाहते.
या कर्मचा-यांना सुसज्ज आणि सुविधायुक्त कार्यालय असणे गरजेचे आहे. तथापि, मंगरुळपीर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय केवळ इमारतीपुरतेच मर्यादित असल्याचे दिसते. या कार्यालयाच्या परिसरात गवत, झुडपे वाढली आहेतच शिवाय कार्यालयासमोरच ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबकेही साचतात. त्यामुळे डास आणि विविध जंतूचा प्रादूर्भाव वाढून कर्मचा-यांच्या आरोग्याला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे.