वाशिम : मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केल्याने वेळ व पैशाची बचत होण्याबरोबरच दोन्ही पक्षकारांचा विजय होतो. त्यामुळे आपसातील तंटे मध्यस्ती प्रक्रियेने सोडविण्याचे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा श. सावंत यांनी १८ सप्टेंबर रोजी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी केंद्राच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित मध्यस्थी संबंधी जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे, जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अॅड. सी. एन मवाळ, अॅड. एस. एन. काळू, विविध बँकांचे प्रतिनिधी, विधिज्ञ व पक्षकार यांची उपस्थिती होती.
मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, अॅड. एस. एन. काळू यांनी यावेळी मध्यस्थी प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गीतांजली गवळी यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव न्या. शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.