रिसोड : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असलेल्या भूमी अभिलेखचा वीज पुरवठा गेल्या महिनाभरापासून खंडित आहे. विद्युत देयक न भरल्यामुळे हा प्रकार घडला असून, यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती मोजणीची कामे प्रलंबित आहेत.विद्युत देयक अदा न केल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने महिनाभरापूर्वी केली. यामुळे संगणक संच बंद पडले आहेत. शिवाय तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे शेत मोजणीचे अर्ज धूळ खात पडून आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकरी दैनंदिन भूमी अभिलेख कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत असताना त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. तथापि, ही समस्या विनाविलंब निकाली काढून शेतकऱ्यांची प्रलंबित कामे पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी मिळाला नसल्यामुळेच विद्यूत देयक अदा करणे कठीण जात आहे. असे असले तरी निधी मंजूर होताच विद्युत देयक अदा करून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला जाईल. शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची आम्हालाही जाणीव आहे. मात्र, जोपर्यंत निधी मिळत नाही, तोपर्यंत काहीच करता येणार नाही. वीज पुरवठा सुरळित झाल्यानंतर कामे गतीने केली जातील.- व्ही.एस. सवडतकरउपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, रिसोड
भूमी अभिलेख कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित
By admin | Published: May 11, 2017 6:51 AM