वाशिम : जिल्ह्यातील पळसखेड (ता. रिसोड) येथे होत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पांमुळे पुनर्वसन करण्यात आलेल्या गावठाणास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १४ जुलै रोजी भेट देऊन पुनर्वसन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा भूसंपादन व पुनर्वसन अधिकारी बिबे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, भूमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक एस. डी. लाखाडे, रिसोडचे निवासी नायब तहसीलदार एस. डी. गोसावी, उपअधीक्षक भूमिअभिलेख विजय सवडकर, जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाळासाहेब खरात, पळसखेडचे सरपंच संतोष खरात, तलाठी ए. एस. नरवाडे, ग्रामसचिव गजानन बोरकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सर्वप्रथम पळसखेड येथील गावठाणाला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडांची पाहणी केली. या भूखंडांवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवणे व भूखंडांची हद्द निश्चित करून ते लाभार्थ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी यावेळी महसूल प्रशासनला दिले. याशिवाय पुनर्वसन झालेल्या गावठाणाच्या ठिकाणी पाणीपुरवठय़ासाठी विहीर, विद्युत पुरवठा व रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश लघुपाटबंधारे विभागाला दिले तसेच पुनर्वसनाबाबत शेतकर्यांनी घेतलेल्या आक्षेपांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केल्या. मिर्झापूर लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्तांचे पांगरखेड (ता. मालेगाव) येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसन झालेल्या या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पांगरखेड येथील जिल्हा परिषद शाळेत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा भूसंपादन व पुनर्वसन अधिकारी बिबे, लघु पाटबंधारे विभागाचे कायर्कारी अभियंता श्रा. ल. पवार, भूमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक एस. डी. लाखाडे, मालेगावचे तहसीलदार डाबेराव यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिका-यांनी जाणल्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा
By admin | Published: July 16, 2015 1:25 AM