लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना जून महिन्याचे मोफत तांदळाचे वाटप सुरू असून, आतापर्यंत प्राधान्य गटातील १ लाख ३५ हजार तर अंत्योदय गटातील ३० हजार शिधापत्रिकाधारक लाभार्थींनी याचा लाभ घेतला.१२ जूनपासून मोफत तांदूळ व प्रती कार्ड एक किलो डाळीचे वितरण रेशन दुकानांमधून केले जाणार आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थींना प्रती कार्ड १ किलो तूर किंवा चना डाळ तसेच तांदळाचे मोफत वितरत करण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात प्राधान्य गटात १ लाख ७७ हजार शिधापत्रिका तर अंत्योदय गटात जवळपास ४८ हजार शिधापत्रिका आहेत. जून महिन्यात नियमित रेशनकार्डधारकांना १२ तारखेपर्यंत स्वस्त धान्य वाटप करण्यात आले. १२ जूनपासून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थींना तांदूळ व तूर किंवा चना डाळीचे वितरण केले जात आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आल्या असून, आतापर्यंत प्राधान्य गटातील १ लाख ३५ हजार तर अंत्योदय गटातील ३० हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ देण्यात आला. उर्वरीत लाभार्थींनी आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधून मोफत धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांनी केले.
दीड लाखावर लाभार्थींना मोफत तांदूळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 4:21 PM