लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत गेल्या चार वर्षांत १३७१ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. शासन निर्देशानुसार या शेततळ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शेततळ्याचे छायाचित्र जिओ टॅगवर अपलोड करणे आवश्यक असताना या सुचनेचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.राज्य शासनाच्या फेब्रुवारी २०१६ च्या निर्णयानुसार राज्यात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यासाठी १९०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. गतवर्षीपर्यंत या योजनेंतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अर्जानुसार स्थळ पाहणी करून १९८० शेततळ्यांना कार्यारंभ आदेश दिले; परंतु कार्यारंभ आदेशानंतरही यातील केवळ १३७१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली, तर उर्वरित ६०९ शेततळ्यांची कामे सहा महिन्यांतही पूर्ण न झाल्याने त्यांचे कार्यारंभ आदेश पूर्वीच रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पूर्ण झालेल्या शेतततळ्यांच्या अनुदानापोटी लाभार्थी शेतकºयांना ६ कोटी ९४ लाख ३१ हजारांच्या निधीतून अनुदानही वितरीत करण्यात आले आहे.
सर्व तालुक्यातील शेततळ्यांची दक्षता पथकांकडून होणार चौकशीजिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात ४५१, कारंजात २४२, मानोºयात २१२, मालेगावाता १७७, रिसोड तालुक्यात रिसोड १५७, तर वाशिम तालुक्यात १३२, शेततळे पूर्ण झाले आहेत.मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींना अनुदान वितरीत करण्यापूर्वी जिओ टॅगिंग करून शेततळ्याचे फोटो अपलोड करणे आवश्यक होते. काही प्रकरणात असे न करण्यात आल्याने या प्रकाराची दक्षता पथकामार्फत चौकशी होणार आहे.
जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लाभार्थींना अनुदान वितरीत करण्यापूर्वी शेततळ्याचे फोटो अपलोड करण्याचा प्रकार प्रत्यक्ष झाला काय, त्याची पडताळणी प्राथमिकस्तरावर केली जात आहे. तांत्रिक चुकीमुळे असा प्रकार काही ठिकाणी घडला असेल. प्रत्यक्षात सर्व शेततळ्यांची कामे ही नियमानुसारच झाली आहेत. चौकशी अंती ते स्पष्ट होईल.- एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी