वाशिम: रखरखत्या उन्हात थेंबभर पाण्यासाठी सैरभैर फिरल्याने दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू होतो. पाण्याअभावी जीव गमावण्याची वेळ पक्ष्यांवर येऊ नये म्हणून मंगरुळपीरच्या वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीमने एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यावतीने दोन हजार मातीच्या जलपात्रांचे वितरण इच्छुकांना करण्यात येत असून, यासाठी जनतेनेही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विषेश म्हणजे हे वन्यजीवरक्षक स्वत:ही जंगलातील झांडावर शेकडो जलपात्र बांधत आहेत.
मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्यावतीने वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी सतत विविध उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, सामाजिक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसाधारण जनतेचे सहकार्यही त्यांच्याकडून घेण्यात येते. यंदाच्या उन्हाळ्यातही त्यांनी पक्षी रक्षणासाठी असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याअभावी दरवर्षी हजारो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागते. ही बाब पर्यावरण आणि सृष्टीसाठी निश्चितच दु:खदायक आहे. त्यामुळे पाण्यावाचून पक्ष्यांचा जीव जाऊ नये म्हणूून, त्यांच्यावतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मातीपासून तयार केलेले २००० हजार जलपात्र वितरित करण्यात येत आहेत. हे जलपात्र इच्छुक लोकांना मोफत वितरित करण्यात येणार आहेत. जलपात्रांची संख्या आणखी वाढविण्याचा त्यांचा मानस असून, यासाठी त्यांनी जनतेला तुटपूंजी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही केले आहे. मंगरुळपीर वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीमचे प्रमुख तथा मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यासह सुबोध साठे, गणेश गोरले, सागर गुल्हाने, वेदांत नावंधर, अतुल कथले, शुभम ठाकूर, गणेशकुमार राऊत, आकाश खडसे आणि शरद दंडे हे सदस्य या उपक्रमासाठी सतत झटत आहेत. नागरिकांनी मदत करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले आहे. पक्षी नावाचा ठेवा जपण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.