लोेकमत न्यूज नेटवर्क वनोजा (वाशिम): रखरखत्या उन्हात थेंबभर पाण्यासाठी सैरभैर उडणाºया पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने २००० हजार जलपात्र वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत संघटनेच्या वनोजा येथील शाखेने मंगळवारी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा आणि भूर येथील जि.प. शाळेत विद्यार्थी, शिक्षकांना जलपात्रांचे वितरण केले. या शाखेकडून जंगलातील झाडांवरही जलपात्र बांधण्यात येत आहेत. जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडूनही मानवाच्या आततायीपणामुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. त्यात जंगलात घोटभर पाण्याची व्यवस्थाही नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसह पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक पर्क्षी रखरखत्या उन्हात पाण्याअभावी मृत्यमुखीही पडताहेत. पाण्याअभावी जीव धोक्यात आलेल्या पक्ष्यांसाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीर आणि मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी जलपात्र वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या वनोजा येथील शाखेने गेल्या काही दिवसांत शेकडो जलपात्र वितरित केले आहे. वनोजा येथील पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, शिवाजी महाविद्यालय, आरोग्यवर्धिनी केन्द्रात त्यांनी जलपात्रांचे वितरण केले. त्यानंतर वनोजा आणि भूर येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळेसह वनोजा येथील ग्रामस्थांनाही मोफत जलपात्र वितरित करण्यात आले. भूर येथील शिक्षक दिपक जायभाये यांच्याकडे सदर जलपात्र सोपविण्यात आले. वनोजा शाखेचे आदित्य इंगोले यांनी विद्यार्थ्यांना घरच्या झाडांवर जलपात्र बांधून त्यात पाणी टाकावे, असे आवाहन केले. वनोजा येथील जि. प. प्रा. मराठी शाळेत शिक्षक राऊत व गावंडे यांच्याकडे जलपात्र सोपविण्यात आले. या उपक्रमासाठी वनोजा शाखेचे चेतन महल्ले, आकाश कांबळे व अमर खडसे, वैभव गावंडे, ओम टोंचर, सौरव इंगोले, सतिष राठोड, गोपाल झोंबाडे, शुभम हेकड, सतिष गावंडे आदि सहकार्य करीत आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील जि.प. शाळांत जलपात्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 5:52 PM