वाशिम : ह्यरन फॉर युनिटीह्ण अर्थात एकता दौडच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, त्याच दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी २८ ऑक्टोबर रोजी अधिकार्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर एकता दौड घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षापासून ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकता दौडचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी देशात भारतीय जनता पक्षाने स्वबळावर ही दौड यशस्वी केली होती. यावर्षी केंद्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती शासकीय-निमशासकीय यंत्रणेने साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत. वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्याबरोबरच एकता दौड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा व यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावरील बहुद्देशीय हॉलमध्ये अधिकारी-कर्मचार्यांची बैठक घेतली. राष्ट्रीय एकता दौड यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा, विविध क्रीडा संघटना, युवा मंडळं, खेळाडूंशी संपर्क साधला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. सर्वांच्या योगदानातून हा कार्यक्रम यशस्वी केला जाईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांनी सांगीतले.
‘राष्ट्रीय एकता दौड’च्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासन लागले कामाला
By admin | Published: October 29, 2014 1:32 AM