विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी विद्यमान संचालक उमेश पाटील ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली, तर माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी तुषार अरविंद इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी माजी संचालक सुरेश गावंडे यांना रिंगणात ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रकाश डहाके व माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवली, आता मात्र हे दोन नेते एकत्र येऊन बँकेची निवडणूक लढविणार असा अंदाज होता. मात्र, आता ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत. विद्यमान संचालक उमेश पाटील ठाकरे, माजी संचालक सुरेश गावंडे आणि तुषार इंगोले यांची उमेदवारी निश्चित झाल्याने मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावून मतदार अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा नेते अरविंद पाटील इंगोले यांचे चिरंजीव तुषार पाटील आपली शेवटची ताकद दाखवून शेवटची लढाई लढण्याची शर्थ करीत आहेत. माजी संचालक सुरेश गावंडे हे माजी आमदार प्रकाश डहाके यांचे विश्वासू असल्याने त्यांना डहाके गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. अशा या राजकीय घडामोडीत तालुक्यातील ३४ मतदारांत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे, तर एका गटाने मतदार बाहेर नेल्याची चर्चा होत आहे.
बंजारा समाजाचे नेते माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांनी अद्यापही आपले पत्ते खुले केले नाहीत, ते कुणाला मदत करतात हेसुद्धा महत्त्वाचे आहे. अशा राजकीय घडामोडींत ही निवडणूक अटीतटीच्या प्रसंगात दोन्ही नेत्यांचे एकमत न झाल्याने आजी- माजी आमदार यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.