यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी मधुकर ठाकरे, सचिन ठाकरे, प्रवीण ठाकरे उपस्थित होते.
ठाकरे कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या ३२ एकर क्षेत्रावर रोजगार हमी योजना व पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेतून फळबाग लागवड केली आहे. यामध्ये संत्रा, पेरू, आंबा, संत्रा किन्नो, विविध प्रजातींची सीताफळे व सफरचंद आदी फळबागांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी श्री. ठाकरे यांच्या शेतामध्ये जाऊन सर्व प्रकारच्या फळबागांची पाहणी केली. तसेच प्रत्येक फळपिकासाठी येणारा उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न याविषयी माहिती जाणून घेतली. ठाकरे यांच्या शेतातील ठिबक ऑटोमायझेशन, शेततळे, नर्सरीचीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन करून त्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. याकरिता सर्व कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना व इतर आनुषंगिक बाबींची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.