वाशिम, दि. १७- रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करून जाळून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ व दोषींवर कारवाईसह उर्वरित ६ आरोपींना अटक करावी, आदी मागण्यांसाठी बसपाचे प्रदेश महासचिव अँड. संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये बहुजन समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. आक्रोश मोर्चा शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बसस्थानक मार्गे, तहसील कार्यालय, सिव्हिल लाइन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये जिल्ह्यातील समाजबांधव सहभागी झाले होते. उपस्थित महिलांनी हातात निषेध बोर्ड घेत दोषींवर कडक शिक्षा झालीच पाहिजे, नराधमांना फाशी द्या, आदी घोषणांनी परिसर निनादून सोडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला अक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला असता, मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, क्रांतिज्योती सावित्री विचार मंचच्या जिल्हाध्यक्ष गिर्हे, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश वानखडे यांनी तीव्र रोष व्यक्त केला. बसपाचे प्रदेश सचिव अँड. संदीप ताजने विचार मांडताना म्हणाले की, सदर प्रकरणातील दोषींविरोधात योग्य ती कारवाई केल्यास याविरोधात लढा अधिक तीव्र करू, असा इशारा दिला. त्यानंतर बसपाच्या शिष्टमंडळाने आपल्या न्याय मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा!
By admin | Published: March 18, 2017 3:05 AM